कोल्हापूर  (प्रतिनिधी) :  शाश्वत सुखासाठी नात्यातील सामंजस्यपूर्ण गोडवा जपणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन लेखिका व समुपदेशिका स्मिता जोशी यांनी केले. महावीर महाविद्यालयाचा  मानसशास्त्र विभाग , वुई केअर सोशल फौंडेशन आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, मानसशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्हॅलेंटाईन डे दिनानिमित्त ‘व्हॅलेंटाईन डे : प्रेमभावना कि कामभावना’ या विषयावर महाविद्यालयात परिसंवादाचे  आयोजन करण्यात आले.  त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. भरत नाईक होते.

‘लग्नसंस्था व कायदा’ या विषयावर बोलताना जोशी यांनी लग्नसंस्थेच्या विविध प्रकारांवर चर्चा केली. तर परिसंवादात समुपदेशिका पूजा इंगवले यांनी ‘प्रेमभावना व कामभावना’ या विषयावर तरुणांची व पालकांची मते जाणून घेऊन  चर्चा केली. तसेच डॉ. सुरेश संकपाळ यांनी लग्न केलेल्या काही जोडप्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमधून प्रेमाचा नेमका अर्थ जाणून घेण्यात आला. ‘प्रेम म्हणजे नक्की काय असतं.. ?’  या विषयावर परिसंवादात डॉ. शिरीष शितोळे यांनी संवाद साधताना प्रेम करत असताना फक्त शारीरिक सौंदर्याला महत्व न देता आपल्या जोडीदारामधील विविध पैलू ओळखून ते स्वीकारणे व जपणे म्हणजेच खरे प्रेम,  असे मत मांडले .

यावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास  केंद्राचे संयोजक डॉ. महादेव शिंदे, वुई केअर सोशल फौंडेशनचे अध्यक्ष सुदर्शन पांढरे,  मनीषा धमोणे, अश्विनी पाटील,  रुपेश कांबळे,  प्रमोद पाटील आदी उपस्थित होते. सलमान मुजावर यांनी सूत्रसंचालन केले. तर विजयकुमार मुत्नाळे व इम्रान शेख यांनी कार्यक्रम समन्वयक म्हणून काम पाहिले.