असंघटित वाहनचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन : ना. हसन मुश्रीफ

0
30

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील ॲटोरिक्षा चालक, टॅक्सी चालक, ट्रक चालक यासारख्या असंघटित वाहनचालकांच्या हितासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी तत्वत: मंजुरी दिली. राज्यातील पंधरा लाखाहून अधिक असंघटित वाहनचालक या कल्याणकारी मंडळात समाविष्ट होतील, असा प्राथमिक अंदाज आहे.

तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यात असंघटित वाहनचालकांसाठी कल्याणकारी बोर्ड स्थापन करण्याबाबत मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या धर्तीवरच असंघटित वाहनचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी संबंधित विभागांकडून प्रस्ताव सादर करण्याबाबत तसेच यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेण्याबाबतच्या सूचना मंत्री मुश्रीफ यांनी संबंधित विभागाला यावेळी दिल्या.

या बैठकीला कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, असंघटित विकास आयुक्त डॉ.अश्विनी जोशी, परिवहन आयुक्त डॉ.अविनाश ढाकणे, कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ, परिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर आदी उपस्थित होते.