यड्राव (प्रतिनिधी) : हुपरी शहराची लोकसंख्या ७५ हजारांपेक्षा अधिक आहे. हुपरी परिसरातील रेंदाळ, यळगूड, जंगमवाडी गावातील नागरिकांना हुपरी आरोग्य केंद्राकडून आरोग्य सेवा दिली जाते. परंतु, या केंद्रात लागणाऱ्या अत्यावश्यक साहित्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना रुग्णांना समाधानकारक आरोग्य सेवा देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे रुग्णांना कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात पाठवावे लागते.

तसेच या आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम होऊन ३४ वर्षे झाली आहे. त्यामुळे येथील सर्वच इमारतींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. तरी या आरोग्य केंद्रात साहित्यांचा तत्काळ पुरवठा व इमारतींची देखभाल दुरुस्ती हातात घ्यावी, अशी मागणी शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी शिष्टमंडळाद्वारे कोल्हापूर जि. प. चे आरोग्य सभापती हंबीरराव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

यावेळी जि.प.शिक्षण सभापती प्रवीण यादव, हुपरी शहरप्रमुख अमोल देशपांडे, महिला आघाडी तालुका संघटिका उषा चौगुले, राजेंद्र पाटील, भरत देसाई, महिला संघटिका मीना जाधव, रेंदाळ ग्रा.पं.सदस्य महेश कोरवी, संजय चौगुले उपस्थित होते.