गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील एरंडपे धनगरवाडा स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी अजूनही  विकासकामांशिवाय उपेक्षीतच राहिला आहे. सुमारे २५ घरांची लोकवस्ती असलेल्या या गावाला ये-जा करण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे या धनगरवाड्याला बारमाही हाल होत आहेत. आ. प्रकाश आबिटकर आणि  लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून येत्या हंगामात हा रस्ता तयार करून द्यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

या धनगरवाड्यातील दैनंदिन कामकाजासाठी, उदरनिर्वाहासाठी तसेच अनेक कारणांसाठी या रहिवाश्यांना अडीच ते तीन किलोमिटरची पायपीट करून दररोज खाली एरंडपे गावी यावे लागते. या धनगरवाड्यावरून येताना अनेक ओढे-नाले वाहत असून पावसाळ्यात ते मोठ्या पाण्याच्या प्रवाहामूळे ओलंडता येत नाहीत. त्यामुळे दळवळणाचा संपर्क तुटतो शिवाय मुलांना शाळेलाही ये-जा करता येत नाही. जीव धोक्यात घालून या वाड्यातील लोक प्रवास करीत आहेत. या वाड्यावरील काही लोकांनी दुचाकी घेतल्या आहेत. परंतु, जिथे रस्ता संपतो तिथेच उघड्यावर त्या लावाल्या लागत आहेत.

जीवनावश्यक वस्तूंसाठी येथील ग्रामस्थांना उन्हाळा, पावसाळा पायपीट करावी लागत आहे. आजवर शासनस्तरावरून या वाड्यावरील लोकांसाठी कोणतीही सुविधा उपलब्ध झाली नाही. महिलांना प्रसुतीवेळी वाहन नसल्याने डोली करून तीन किमी.चे अंतर पार करून आणावे लागत आहे. यामुळे अनेक बाळंतीणींनाना आपला जीव गमवावा लागला आहे. दरवेळी अनेक उमेदवार निवडणूक आली की अनेक अमिषे दाखवतात. त्यानंतर कोणीच फिरकतच नसल्याची खंत इथल्या ग्रामस्थांनी व्यक्त केली.