कोल्हापूर (प्रतिनिधी) : नृत्यविषयक कार्यक्रम सादरीकरणासाठी प्रत्येक जिल्ह्यात  एकतरी सर्वसोयींनीयुक्त नृत्यालय उभारण्यात यावे. त्यात ग्रंथालय व कार्यशाळेची सोय असावी. त्याचसोबत शास्त्रीय, वेस्टर्न, लोकनृत्य यांचे अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती देखील ठरविण्यात आली. याबाबत ठराव करून शासन मान्यतेसाठी पाठविण्याचा निर्णय कोल्हापुरात आज (रविवार)  झालेल्या नृत्यकर्मी संमेलनात घेण्यात आला.  

या संमेलनाचे उद्‌घाटन मेघराज राजेभोसले यांचे हस्ते व डॉ. स्वागत तोडकर व डॉ. प्रवीण कोडोलीकर यांचे उपस्थितीत झाले. यावेळी नृत्यपरिषदच्या वेबसाईटचे अनावरण करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक सागर बगाडे (पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख) यांनी केले.

मेघराज राजेभोसले यांनी भावी संकल्पना व उपक्रम यांच्याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी  पंकज चव्हाण यांची विभाग सचिव म्हणून तर महेश पाटील, चंद्रकांत पाटील, अशोक आखाडे, सागर सारंग यांची विभागीय सहसचिव म्हणून निवड करण्यात आली. रोहित मन्दृलकर व प्रज्योत सोहनी यांची पाश्चात्य अभ्यासक्रम समितीवर निवड करण्यात आली. दुपार सत्रात भुपेश मेहेर, जतीन पांडे, दीपक बिडकर, डॉ. विनोद निकम यांची व्याख्याने झाली.

परिसंवादमध्ये अध्यक्ष संतोष माने (सांगली), राहुल कदम (सिंधुदुर्ग), अमित कदम (रत्नागिरी), महेश निकम्बे (सोलापूर), दीपक बिडकर (कोल्हापूर) यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्हा नृत्य परिषदच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.