उद्योजकांच्या विजेच्या समस्या सोडविण्यास कटिबध्द : कावळे

0
135

कोल्हापूर (प्रतिनिधी) : औद्योगिक ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीज पुरवठा मिळावा या भूमिकेतून महावितरण व उद्योजक यांच्यात सातत्यपूर्ण संवाद सुरू आहे. मे महिन्यातील बैठकीनंतर महावितरण व मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले यांचे शिष्टमंडळासमवेत पाठपुरावा बैठक झाली. यावेळी उद्योगांसाठी वीज सुविधांचे बळकटीकरण करणे आणि उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यासाठी महावितरण कटिबध्द असल्याचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी सांगितले.

कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वासाहतीत महापारेषण कंपनीच्या उपकेंद्रातील रोहित्राची ५० एमव्हीए ते १०० एमव्हीए क्षमतावाढीचे काम अंतिम टप्प्यात असून, ते लवकरच पूर्ण होणार आहे. महावितरणच्या स्वतंत्र कार्यालयाच्या प्रस्तावाबाबत कावळे यांनी स्पष्ट केले की, कागल-हातकणंगले औद्योगिक वसाहतीमधील ग्राहकसंख्या लक्षात घेता ते प्रशासकीयदृष्ट्या सोयीचे नाही. आठवड्यातील एक दिवस संबंधित शाखा अभियंता यांना तेथील उपकेंद्रात उपस्थित राहावे असे निर्देशित केले असल्याचे कावळे यांनी सांगितले.

‘डी’ व ‘जी’ ब्लॉकमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडितची समस्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केली. त्यासंदर्भात कार्यकारी अभियंता सुनील शिंदे यांनी सांगितले की, मे व जून महिन्यात वादळी वारा व पाऊस या नैसर्गिक कारणास्तव वीजपुरवठा खंडितची समस्या उद्भवली. डी व जी ब्लॉकमध्ये स्वतंत्र कर्मचारी व वाहन उपलब्ध असल्याने तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

वारंवार वीज खंडित होऊ नये, यासाठी उर्वरीत देखभाल व दुरूस्तीची कामे करून घेण्यात येतील. ए,बी,सी,डी व जी ब्लॉककरिता नवीन ३३/११ विद्युत उपकेद्रांकरिता एमआयडीसीकडून मिळालेल्या भूखंडाची नोंदणी प्रक्रिया सुरू असून, जुलैअखेर तो भूखंड महावितरण ताब्यात घेईल,अशी माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता (स्थापत्य) प्रवीणकुमार थोरात यांनी बैठकीत दिली.

या बैठकीस मॅकचे अध्यक्ष संजय पेंडसे, उपाध्यक्ष यशवंत पाटील, सचिव शंतनू गायकवाड, उपविभागीय अभियंता विनोद घोलप, सहायक अभियंता वीणा मटकर, महेश पाटील यांच्यासह उद्योजक व मॅक पदाधिकारी उपस्थित होते.