चेन्नई (वृत्तसंस्था) : चौथ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा एक डाव राखून आणि २५ धावांनी दारूण पराभव केला. भारताने पहिल्या डाव्यात १६० धावांची आघाडी घेतली. त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांना आर अश्विन आणि अक्षर पटेलच्या फिरकी समोर निभाव लागला नाही. दोघांनीही प्रत्येकी ५ बळी घेत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या सामन्यासोबतच भारताने ४ सामन्यांची कसोटी मालिका ३-१ ने खिशात घातली. या विजयामुळे भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपसाठी पात्र ठरला. 

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर ४३ धावांवर असताना अक्षर पटेल रन आऊट झाला. दुसरीकडे वॉशिंग्टन सुंदर शतकाच्या उंबरठ्यावर होता. पण इशांत आणि सिराज यांनी आपली विकेट गमावल्यामुळे त्याची शतकाची संधी पुन्हा एकदा हुकली. वॉशिंग्टन ९६ धावांवर नाबाद राहिला. ३६५ धावांवर ऑल आऊट झालेल्या भारतीय संघाने १६० धावांची आघाडी घेतली.

दरम्यान, अश्विनने क्रॉलीची विकेट घेत इंग्लंडला पहिला धक्का दिला. यानंतर आलेल्या ब्रेनस्टॉला अश्विनने झेलबाद केले. यानंतर अक्षरने सिब्ले आणि बेन स्टोक्सची विकेट घेतली. इंग्लंडची धावसंख्या २० ओव्हर्सनंतर ४० धावांवर ४ बाद अशी होती. यानंतर अश्विन आणि अक्षरने जो रुट आणि पोपची विकेट घेत इंग्लंडला पराभवाच्या छायेत उभे केले. डॅन लॉरेन्स अर्धशतक केले. पण इंग्लंडच्या इतर एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. सहा फलंदाजांना केवळ एक अंकी धावसंख्या करता आली.