इचलकरंजी महावितरण कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणाची ऊर्जामंत्र्यांकडून दखल  

0
156

कोल्हापूर (प्रतिनिधी) : घरगुती व व्यावसायिक वीजजोडणी खंडित केल्याच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांनी इचलकरंजी येथील महावितरण कार्यालयाची शुक्रवारी तोडफोड केली होती. या गंभीर प्रकरणाची ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दखल घेतली आहे. त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून व्यक्तिशः विचारपूस करून त्यांचे मनोबल वाढविले.

वीज बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी औद्योगिक वीज पुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून महावितरणच्या साजनी शाखा कार्यालय येथे तोडफोड केली होती.  यावेळी गजानन जाधव, स्वप्नील जाधव, सचिन खाडे व इस्माईल पेंढारे यांनी महावितरण अधिकारी कर्मचारी यांना शिवीगाळ, धक्काबुक्की व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर महावितरणच्या इचलकरंजी विभागीय कार्यालयात गजानन जाधवसह इतर १५ ते २० जणांनी धुडगूस घालून दहशत निर्माण करीत कार्यालयाची  तोडफोड  करून  अधिकारी व कर्मचारी यांना धक्काबुक्की व मारहाण केली.  महावितरणकडून संबंधिताविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाणे, इचलकरंजी व हातकणंगले पोलीस ठाणे  येथे स्वतंत्ररित्या गुन्हे दाखल केले आहेत.