मुंबई (प्रतिनिधी) : लॉकडाऊनमध्ये आलेल्या वाढीव वीज बिलासंदर्भात संपूर्ण राज्यभरात सामान्यांमधे असंतोष निर्माण झाला आहे. वाढीव वीज बिले सरकारने माफ करावीत, अशी मागणी जनतेमधून होत आहे. पण उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज बिल भरणे सर्वांसाठी अनिवार्य आहे सांगितल्यावर जनतेमधील असंतोष उफाळून आला आहे. याचसंदर्भात, ‘उर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन महावितरणच्या कार्यालयात क्लार्कचं काम करावं म्हणजे आम्ही त्यांच्याकडे बिलं घेऊन तपासणीसाठी येतो’, असा खोचक टोला विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी लगावला आहे.

‘भाजपा नेत्यांनी वीज बिलं घेऊन माझ्या कार्यालयात यावं मी ती बिलं तपासून पाहिन. वाढीव वीज बिल नसतील तर आम्ही सगळी बिलं भरु असं प्रॉमिस त्यांनी करावं असं नितीन राऊत यांनी काल (शुक्रवार) झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते. आता त्यांना भाजपाच्या प्रविण दरेकरांनी खोचक टोला लगावला आहे.

त्यांना आज खोचक टोला लगावत प्रविण दरेकर यांनी उत्तर दिले आहे. ‘नितीन राऊत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि क्लार्क म्हणून महावितरणमध्ये नोकरी पत्करावी मग आम्ही त्यांना बिलं दाखवायला येऊ. बिलं तपासणं हे काय मंत्र्याचं काम आहे का?’ असाही प्रश्न दरेकर यांनी विचरला. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उस्मानाबादमध्ये आलेल्या प्रविण दरेकर यांनी हे वक्तव्य केलं आहे.

‘उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी १०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली. त्यावरही दरेकर यांनी टीका केली आहे. आधी १०० युनिट मोफत देण्याची घोषणा केली आणि आता म्हणत आहेत की सवलत देऊ. हे वीज ग्राहकांच्या जखमांवर मीठ चोळणं आहे. महाविकास आघाडी सरकार जुलूम करणारं असून राज्यात सध्या अस्थिरतेचं वातावरण आहे’, असंही प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.