कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरातील मणकर्णिका कुंडावरील अतिक्रमणाबाबत माऊली लॉजमालकाने दोन वेगवेगळी पत्रे पाठवून विसंगत भूमिका घेतली आहे. यामुळे नावच वाद होण्याची शक्यता आहे. माऊली लॉज व्यवस्थापनाने शिवसेना पदाधिकाऱ्याला आणि देवस्थान समितीला दिलेल्या पत्रात अतिक्रमणाबाबत दुहेरी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे याबाबत देवस्थान समिती निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

श्री अंबाबाई मंदिर परिसरातील ऐतिहासिक मणकर्णिका कु़ंडाचे उत्खनन सुरू असून त्यामध्ये १४०० हून जास्त वस्तू सापडल्या आहेत. मात्र जोतिबा रोडवरील माउली लॉजने मणकर्णिका कुंडावर दहा फूट अतिक्रमण केल्यामुळे काही दिवसांपूर्वी जिल्हा शिवसेनेच्या वतीने या लॉजसमोर आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी चार दिवसात अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी अन्यथा लॉज बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला होता.

लाँज व्यवस्थापनाने सोमवारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना एक पत्र पाठवून आम्ही सदरचे अतिक्रमण काढून घेतो आंदोलन स्थगित करावे असे सांगितले होते. तर दुसरीकडे देवस्थान समितीला पाठवलेल्या पत्रामध्ये मणकर्णिका कु़ंडाविषयी आम्ही संवेदनशील असून अतिक्रमण ही बाब न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य कार्यवाही करावी असे म्हटले आहे. तर याची प्रत ही जिल्हा पोलीस प्रमखांसह जुना राजवाडा पोलीस ठाणे, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना पाठवण्यात आली आहे. माऊली लॉजच्या अतिक्रमणाबाबतच्या भूमिकेच्या पत्रामधील विसंगतीमुळे पुन्हा नवा वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देवस्थान समिती यात काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.