टोप (प्रतिनिधी) : भविष्य निर्वाह निधी रक्कमेत १५ लाखांचा अपहार केल्या प्रकरणी शिरोली औद्योगिक वसाहतीमधील ‘के अँड के’ क्राफ्टस्मन कंपनीच्या दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर उत्तमराव काळे (रा.   कदमवाडी रोड, लक्ष्मणराव मोहिते कॉलनी, कोल्हापूर), विवेक मदन कावळे (रा.  फंटासिया रहेजा गार्डन, एलबीएस मार्ग, ठाणे) यांच्यावर  गुन्हा दाखल झाला आहे.  या प्रकरणी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील प्रवर्तन अधिकारी प्रकाश जयपाल नाईक (वय ५६) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य राष्ट्रीय कामगार संघ (इंटक) या संघटनेचे जिल्हा सचिव प्रदिप विलास कांबळे यांनी के अँड के क्राफ्टस्मन या कंपनीने ४५ कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा न केल्याची तक्रार भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे केली होती. त्यानुसार अधिकारी नाईक यांनी कार्यालयातील रेकॉर्डची तपासणी केली असता त्यांना २०१४ ते २०१९ या कालावधीमधील कंपनीच्या कामगारांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम जमा केली नसल्याचे लक्षात आले. भविष्य निर्वाह निधीची रक्कम १५ लाख १७ हजार ५९२ रुपये ही कार्यालयाकडे जमा न करता ती स्वत:च्या फायद्याकरीता वापरुन संगनमताने अपहार केल्याचे उघड झाले. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस.बी.मुल्ला करत आहेत.