स्क्रॅपमध्ये ५७ लाखांचा अपहार : एकावर गुन्हा

0
226

टोप (प्रतिनिधी) : पितळ, तांबे, जर्मनचे स्क्रॅप देतो असे सांगून ५७ लाख १४ हजारांचा अपहार केल्या प्रकरणी यमनुर रामचंद्र गोंधळी याच्याविरोधात शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद प्रविण ताराचंद पारेख यानी दिली आहे. 

पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, प्रविण पारेख यांचे शिरोली पुलाची,  सांगली फाटा येथे पारेख मेटल आणि साई मेटल नावची फर्म आहे. त्यांचा होलसेल भांडी विक्री तसेच जर्मन, पितळ, तांबे याची मोड घेण्याचा व्यवसाय आहे. यमनुर गोंधळी हा २०१९ पासून प्रविण यांच्या दुकानात आपल्याकडे आलेले पितळ, तांबे, जर्मनची मोड घेवून दुकानात देण्यासाठी वरचेवर येत होता. त्यामुळे प्रविण यांचा विश्वास यमनुर याच्यावर असल्याने आणि नेहमीचे गिऱ्हाईक असल्याने प्रविण यमनुर याला व्यवसायासाठी अगाऊ रक्कम देत होते. हा व्यवहार लाखांच्या घरात होता.

प्रविण पारेख यांना यमनुर याने जर्मन, पितळ, तांब्याची मोड स्क्रॅप आणुन देतो असे सांगत प्रविण यांच्याकडून वेळोवेळी बँक खात्यावरुन १८ लाख रुपये आरटीजीएसव्दारे ट्रान्सफर करुन घेतली. तसेच रोख रक्कम २५ लाख घेतले. सांगली येथील एसजे ट्रेडर्स या कंपनीकडून ४५ लाखांचा मालही घेतला. त्यापैकी प्रविण पारेख यांना सुमारे ३१ लाखांचा मोडीचा माल देऊन उर्वरित १४ लाखांचा अपहार केला. असा एकुण ५७ लाखांचा यमनुर याने अपहार केला. याची फिर्याद प्रविण पारेख यांनी दिल्यानंतर यमनुर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.