कोल्हापूर (प्रतिनिधी) :  महानगरपालिका आरोग्य कीटकनाशक विभागामार्फत सुरु केलेल्या डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहिमेत आज (बुधवार) ९ प्रभागातील १२७१ घरांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत २०७५ कंटेनर तपासण्यात आले. त्यामध्ये ८३ ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या असून त्या टेमिफॉस हे द्रावण टाकून नष्ट करण्यात आल्या.

शहरातील प्रभाग क्र. १६, १९, २५, ३०, ३७, ४५, ६१, ७१ व ७८ या  ९ प्रभागात डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहीमेत राबविण्यात आली. तब्बल १२७१ घरांमधील कंटेनर, फ्रीज, बॅरेल, सिंटेक्स टाक्या, कुंड्या, टायर आदि २०७५ बाबींची तपासणी करण्यात आली असता ८३ ठिकाणी डेंग्यूच्या अळया आढळून आल्या त्या औषध टाकून नष्ट करण्यात आल्या. तसेच औषध व धूर फवारणीवरही भर देण्यात आला आहे.

यापुढेही ही मोहीम अधिक गतिमान केली जाणार असून डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहिमेमध्ये डास अळी सर्वेक्षण औषध फवारणी व धूर फवारणी तसेच टायर जप्ती मोहीम व शौचालयाच्या वेंट पाइपला जाळी बांधण्याचे काम कोल्हापूर महानगरपालिकेने हाती घेतले आहे. नागरिकांनी खबरदारी म्हणून आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे व टायर्स, नारळाच्या करवंट्या, फुटके डबे जेणेकरून पाणी साठणार नाही अशा वस्तूंचा त्वरित नायनाट करून डेंग्यू चिकनगुनियावर नियंत्रित ठेवण्यास मदत करावे असे आवाहन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.