गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील शेणगांव येथे ११ घरांमध्ये  वेदगंगेच्या महापुराचे पाणी शिरले आहे. दरम्यान, येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर आणि पुजाऱ्यांचे घर यावर्षी दुसऱ्यांदा पाण्याखाली गेले आहे.   दरम्यान, प्रांत संपत खिल्लारी आणि तहसिलदार अश्वीनी वरूटे यांनी याठिकाणी भेट देवून ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ज्या घरात पाणी शिरले त्यांची घरे खाली करण्यात आली आहेत.

दरम्यान, यावर्षी नव्याने बनवण्यात आलेला गारगोटी-नाईकवाडी हा डांबरी रस्ता शेणगांव येथेच पाण्याखाली गेला आहे. गारगोटी-गडहिंग्लज मार्गावर पांगिरे येथे पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतुक बंद झाली आहे. तसेच कोल्हापूर-गारगोटी मार्गावर कलनाकवाडी येथे मुख्य रस्त्याला पाणी आल्याने कोल्हपूरकडे येजा करणारी वाहतुक बंद झाली आहे. गारगोटी वेंगरूळ रस्त्यावर ओढ्या-नाल्यांना पाणी आल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. सालपेवाडीच्या ओढ्यावर महापुराचे पाणी येवून वाहतूक थांबली आहे. पुष्पनगरमध्ये ओढ्याचे पाणी अनेक घरात पाणी शिरले आहे. कूर, मडिलगे येथेही मुख्य रस्त्यावर वेदगंगेच्या महापुराचे पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीस संध्याकाळी बंद झाला आहे.

ममदपूर, शेळोली येथेही महापुराचा तडाखा येथील ग्रामस्थांना बसला आहे. गारगोटी शहरात अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत. गारगोटी नजिकच्या पाल घाटात पाणी रस्त्यावर आल्याने या महामार्गाने पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे. मुरुकटे, दिंडेवाडी येथे पाणी रस्त्यावर आले आहे. म्हसवे, गारगोटी, शेणगांव आदी सर्व बंधारे पाण्याखाली गेल्याने भुदरगड तालुक्यातील वाहतुक व्यवस्था कोलमडली आहे.