धामोड (प्रतिनिधी) :  राधानगरी तालुक्यातील धामोड येथील विद्युत महामंडळ अंतर्गत येणाऱ्या केळशी बुद्रुक शेती पंप फिडरवरील एमएआरसी हे आर्थिक भुर्दंड घालणारे जाचक धोरण महामंडळाने तात्काळ बंद करावे. अशी मागणी या फिडरतंर्गत येणाऱ्या विद्युत पंपधारकांनी आज (बुधवार) धामोड येथे महावितरणचे राधानगरी सहाय्यक अभियंता गिरिष भोसले यांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, महावितरण कंपनीने १५ मे ते आजआखेर विद्युत पंपाचे रिडींग न घेता सरसकट एमएआरसी धोरणानुसार एचपीवरती बिल आकारणी केली आहे‌. त्यामुळे मागील दोन वर्षांच्या बिलाचा विचार करता सरासरी प्रत्येक शेतकऱ्याला तीनपट जास्त बिल आले आहे. शिवाय हे बिल न भरल्यास महावितरण कंपनीने वीज कनेक्शन तोडण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यामुळे एमएआरसी जाचक अटीतून केळोशी फिडर काढून येथून पुढे युनिटवर वीज बिल आकारणी करून एकाही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन तोडता कामा नये. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असाही इशारा देण्यात आला.

यावेळी महावितरणचे अनमोल भोसले, रवी पाटील, धामोडचे माजी डे. सरपंच लक्ष्मण खोत, शिवाजी कुरणे, मल्हारी शिंदे, दिनकर पाटील, सागर पाटील, कृष्णात पाटील, सदाशिव पाटील, एम.के. पाटील, भगवान सावंत, आनंदा चौगले, प्रितम नलवडे, शेतकरी उपस्थित होते.