शिरोळ (प्रतिनिधी) : सहकार चळवळ वृद्धिंगत व्हावी, यासाठी देशभक्त स्व. रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी सन १९७१ मध्ये शिरोळ तालुका विश्वस्त मंडळाची स्थापना केली होती. संस्थेची निवडणूक तब्बल २८ वर्षानंतर पार पडली. मागील अनेक वर्षापासून या संस्थेवर विश्वस्त मंडळ कार्यरत नव्हते. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेची निवडणूक आज (रविवार) बिनविरोध झाली.

या संस्थेच्या स्थापनेनंतर देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्यासह सात जणांचे विश्वस्त मंडळ कार्यरत होते. एकमताने आणि एकविचाराने संस्थेचा कारभार सुरू असल्याने काही वर्षे संस्थापक संचालक मंडळ यांनी निरंतर काम पाहिले. पण मागील बऱ्याच वर्षापासून संस्थापक विश्वस्त मंडळातील सात पैकी पाच विश्वस्तांचे निधन झाल्यामुळे या संस्थेवर हे मंडळ कार्यरत नव्हते.  या संस्थेची निवडणूक व्हावी यासाठी न्यायालयाने मार्च २०२० मध्ये ॲड. समृद्धी माने यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक तातडीने लावता आला नाही. पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जुलै २०२१ मध्ये या संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची अंतिम तारीख १७ जुलै होती. या तारखेअखेर विश्वस्त पदासाठीच्या ७ जागांसाठी ७ अर्ज दाखल झाले होते. आज या अर्जांची छाननी होऊन अन्य कोणताही अर्ज आला नसल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली असल्याचे घोषित केल.

 

यामध्ये संजय नांदणे (कोथळी), शिवगोंडा पाटील (नवे दानवाड), अनंत बाळकृष्ण धनवडे (नरसिंहवाडी), फजलेअली पाटील (आलास), विद्याधर कर्वे (उमळवाड), सुरेश तकडे (शेडशाळ), पोपट भोकरे (कवठेसार) अशा सात जणांची विश्वस्त म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय लोटे यांनी काम पाहिले.