नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहार विधानसभा निवडणुकीतही पराभव पत्करावी लागल्याने आता काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्षाच्या निवडीची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचा आगामी अध्यक्ष डिजीटल पद्धतीने निवडण्याचा निर्णय घेण्यात आला आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षाचा अध्यक्ष डिजीटलपद्धतीनेच निवडला जाणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा अध्यक्ष डिजीटल पद्धतीने निवडण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या प्रतिनिधी मंडळाला डिजीटल आयडी कार्ड जारी करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यासाठी सेंट्रल इलेक्शन ऑथोरिटीने मतदार यादीही तयार करण्यास सुरुवात केली आहे. या ऑथेरिटीने राज्यांमधील सर्व युनिट्सकडून एआयसीसी प्रतिनिधींचे डिजीटल फोटो मागवले आहेत. या निवडणुकीत सुमारे १५०० प्रतिनिधी भाग घेणार आहेत. दुसरीकडे राहुल गांधी यांनाच पुन्हा अध्यक्षपद देण्याची काँग्रेसकडून तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अन्य कुणी दावा केल्यास ही निवडणूक नाट्यमय वळण घेण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत राहुल गांधी विजयी झाल्यास तेच पक्षाचे निर्विवाद नेते असून सर्वात लोकप्रिय नेते असल्यावरही शिक्कामोर्तब होणार आहे. परंतु, अध्यक्षपदाचे दावेदार वाढल्यास सेंट्रल इलेक्शन ऑथोरिटीला पूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, राहुल गांधी हे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहणार की नाही? याबाबतचा सस्पेन्स कायम आहे.