कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेतील ९ विषय समिती समित्यांमधील १४ पदे रिक्त आहेत. या पदांसाठी उद्या (मंगळवार)  सर्वसाधारण सभेत निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. दुपारी एक वाजता या सभेला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला ही निवडणूक होणार आहे. ही निवडणूक अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि सदस्यांच्या उपस्थितीत ही पार पडणार आहे.

यामध्ये दुपारी १ ते १.१५ या वेळेत नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे. १.१६ ते १.२५ दरम्यान माघारीची मुदत आहे. १.२६ ते १.३५ दरम्यान उमेदवारी अर्जाचे वाचन केले जाणार आहे. २.१५ वाजेपर्यत निवडणूक प्रक्रिया विषद केल्यानंतर २.१६ ते ४.१५ या कालावधीत आवश्यक असल्यास मतदान होणार आहे. त्यानंतर मतमोजणी होणार आहे. ६७ सदस्यांपैकी प्रविण दौलत माने यांचे निधन झाले आहे. तर विजय भोजे यांना दिलेल्या न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना मतदानाचा अधिकार नाही. त्यामुळे ६५ जिल्हा परिषद सदस्य आणि १२ पंचायत समिती सभापतींना मतदानाचा अधिकार आहे. त्यानुसार जि. प. प्रशासनाकडून ७७ मतपत्रिका तयार केल्या असून प्रत्येक निवड समितीसाठी वेगळी मतपत्रिका तयार केली आहे.

जिल्हा परिषदेमध्ये एकूण ९ विषय समित्या आहेत. यामध्ये स्थायी समितीमधील २ पदे रिक्त आहेत. समाजकल्याणमधील १, बांधकाममधील १, शिक्षण २, कृषी १, पशुसंवर्धन २, महिला, बालकल्याण २, अर्थ २ तर आरोग्य समितीमधील १ असे नऊ समित्यांमधील १४ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांसाठी उद्या निवडणूक होणार आहे.