नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या पदुच्चेरी विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. यामुळे राजकीय रणधुमाळीला आणखीनच वेग येणार आहे. २७ मार्चला निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. आसाममध्ये ३ टप्प्यात, पश्चिम बंगालमध्ये ८ टप्प्यात तर तामिळनाडू, केरळ आणि पदुच्चेरीत एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या सर्व निवडणुकीचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे.

निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनील अरोरा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, केरळ, तमिळनाडू आणि पदुच्चेरी विधानसभेसाठी एकाच टप्प्यात, एकाच दिवशी म्हणजे ६ एप्रिलला मतदान होणार आहे. आसाममध्ये २७ जून, १ आणि ६ एप्रिलला मतदान होणार आहे. मात्र, पश्चिम बंगाल हे मोठे राज्य असल्याने ८ टप्प्यात मतदान होणार आहे. या राज्यातील मतदान २७ मार्च, १ एप्रिल, ६, १०, १७, २२, २६ आणि २९ एप्रिल रोजी होणार आहे. दि. २ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.