राशिवडे (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील म्हाळुंगे येथील वृद्धेचा चोरीच्या उद्देशाने खून झाल्याचे उघडकीस आले. लक्ष्मीबाई पाटील (वय ७५) असे खून झालेल्या वृद्धेचे नाव आहे. पिता-पुत्राने गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले.

चोरीच्या उद्देशाने गावातीलच ओळखीच्या पिता-पुत्राने हा खून केला आहे. अंगावरील चार लाख ५० हजार रकमेचा सोन्याचा ऐवज लंपास करण्याचे हेतूने प्रथम गळा दाबून वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याचे हेतूने हा मृतदेह पोत्यात घालून निगवे खालसा दरम्यानच्या ओढ्याखाली टाकण्यात आल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. इस्पुर्ली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तपास करून ही घटना उघडकीस आणली.

गावातीलच या महिलेच्या ओळखीचे असणारे बचाराम शंकर पाटील (वय ४५) आणि त्याचे वडील शंकर पाटील (वय ७०) या दोघांनी हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. दि.२३ नोव्हेंबरला ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये नोंद केली होती.

म्हाळुंगे गावात बसवलेल्या सीसीटीव्हीमुळे खरा प्रकार उघडकीस आला. कॅमेऱ्यामध्ये लक्ष्मीबाई ह्या आरोपीच्या घरी गेलेल्या दिसतात. नंतर त्या घराबाहेर न आल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला संशयित आरोपींना ताब्यात घेतले. या दोघांनी वृद्धेच्या गळ्यातील दागिने काढून घेतले आणि गळा दाबून खून केला. या पिता-पुत्राने काही जणांकडून पैसे उसने घेतले होते. लक्ष्मीबाई बेपत्ता झाल्यानंतर संशयितांनी घेतलेले पैसे परत केले. पोलिसांनी हा धागा पकडून तपास सुरु केला आणि खुनाची घटना उघडकीस आणली.