आकुर्डे येथे कौटुंबिक वादातून वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या…

0
1767

गारगोटी (प्रतिनिधी) : कौटुंबिक भांडणाचे पर्यवसान वयोवृद्ध दांपत्याच्या आत्महत्येत झाल्याचा खळबळजनक प्रकार आज (शुक्रवार) सकाळी साडेअकराच्या सुमारास आकुर्डे (ता. भुदरगड) येथे घडला आहे. सदाशिव भांदिगरे (वय ६३) आणि सुरेखा सदाशिव भांदिगरे (वय ५८) असे त्यांचे नाव आहे. या प्रकाराने आकुर्डे गावावर शोककळा पसरली असून भुदरगड तालुक्यात खळबळ उडाली आहे. भुदरगड पोलिसात याची नोंद झाली आहे.

सदाशिव भांदिगरे हे मौनी विद्यापीठाचे निवृत्त कर्मचारी आहेत. त्यांच्या कुटुंबात वाद असून त्याबाबत चर्चा करण्यासाठी रविवार दिनांक ७ मार्च रोजी बहीण व नातलग आकुर्डे येथे येणार होते. मात्र, त्यापूर्वी त्यांनी पत्नीसह आज सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांच्या घरातील एका खोलीत, एकाच वेळी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर गावात खळबळ उडाली. भुदरगड पोलिसात माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

सदशिव भांदिगरे हे शांत स्वभावाचे व समंजस असल्याचे त्यांचे सहकारी सांगतात. घरगुती कुरबुरी असल्या तरी ते इतके टोकाचे पाऊल उचलणार नाहीत, अशी चर्चा कर्मचाऱ्यांसह संबंधितांमध्ये आहे. भांदिगरे यांनी कालच श्री मौनी विद्यापीठाच्या आयसीआरई कॉलेजला रुपये २५ हजारांची देणगी दिली होती. कालच त्यांनी आपल्या देणगीचा चेक प्राचार्य यांच्याकडे सुपूर्त केला होता. या घटनेला चोवीस तास उलटतात तोवरच ही घटना घडली आहे. या प्रकाराने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.