मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे केवळ सहीपुरते उरले असून त्यांच्या सर्व फायली मातोश्रीमधून मंजूर केल्या जातात असे सांगितले होते. तसेच ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असा गौप्यस्फोटही केला होता. यावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेनेने मला कायम भरभरून दिले आहे. माझी निष्ठा अखंड शिवसेनेबरोबर आहे. माझ्या नगरविकास विभागात कोणाचा कोणताही हस्तक्षेप नाही. मी कंटाळलो व लवकरच निर्णय घेणार’, असा जावईशोध केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुठून लावला हे त्यांचे त्यांनाच माहित. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भक्कम नेतृत्वाखाली आता एक शिवसैनिकही कोणाला हलवता येणार नाही, असा दावा मंत्री शिंदे यांनी केला. मी शिवसैनिक असून माझी निष्ठा केवळ शिवसेनेशी आहे. पक्षाने मला ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या प्रामाणिकपणे पार पाडणे, एवढेच मला माहित आहे. स्वार्थासाठी इकडून तिकडे उड्या मारणे हे माझ्या रक्तात नाही. राणे हे आता केंद्रीय मंत्री असून त्यांच्या खात्याचे धोरणात्मक निर्णय हे पंतप्रधानांच्या संमतीशिवाय नक्कीच मंजूर होत नसावेत, असा टोलाही त्यांनी लगावला.