मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची निवड केली असून, प्रतिशिवसेना चालवण्याचा त्यांचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

शिंदेंनी आपल्या अधिकारात परस्पर शिवसेनेचे प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती करत एक प्रकारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हानच दिले आहे. यानंतर मुख्यमंत्री काय निर्णय घेता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेकडून कारवाई सुरू करण्यात आली असून बैठकीला हजर राहा अन्यथा अपात्र ठरवू, असे पत्र बंडखोर आमदारांना पक्षाकडून पाठवण्यात आले आहे. शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांना पत्र पाठवले आहे. या पत्रातून बैठकीला उपस्थित राहिला नाहीत, तर थेट कारवाई करणार असल्याचे आमदारांना ठणकावून सांगितले आहे.

एकनाथ शिंदेंकडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र लिहिले असल्याची माहिती आहे. यात शिवसेनेच्या ३४ आमदारांच्या स्वाक्षरी सहित हे पत्र पाठवण्यात आले आहे. सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, असे ट्विट त्यांनी केले आहे. गटनेते पदावरून हटवल्यानंतरही हा निर्णय़ बेकायदेशीर असल्याचे शिंदे यांनी म्हटले होते. आपल्याकडे बहुमत असल्याने असा निर्णय घेता येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.