मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या सर्व महत्त्वाच्या पदांवरून हकालपट्टी करण्याचा निर्णय शिवसेनेचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय कारवाई करणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. अखेर उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेत एकनाथ शिंदे यांच्यावर वर मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली असली, तरी राजकीय संघर्ष सुरूच आहे. बंडखोर आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांबाबत काय भूमिका घेतली जाईल, असा प्रश्न होता.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदेंवर कारवाईचा बडगा उगारला आहे. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेनेतील सर्व पदावरून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कृत्यांमध्ये सहभागी झाल्याचा कारणावरून ही कारवाई करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांना सर्वपदावरून हटवण्यात आलेले हे पत्र ३० जून रोजीचे आहे. त्यावर सुरूवातीलाच एकनाथ शिंदे यांचे नाव असून, उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी आहे.

पक्षविरोधी कृत्यांमध्ये तुमचा सहभाग असल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर तुम्ही शिवसेनेचे सदस्यत्व सोडलेले आहे. त्यामुळे तुमच्यावर ही कारवाई करण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून माझ्या अधिकारांचा वापर करत तुम्हाला पक्षाच्या सर्व पदावरून काढण्यात येत आहे, असे या पत्रात म्हटलेले आहे.