एकनाथ खडसेंचा पहिला धक्का : भाजप आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर    

0
190

जळगांव (प्रतिनिधी) : भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे  भाजपला पहिला धक्का देण्याच्या  तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. वाढदिवसानिमित्त  लावलेल्या पोस्टरवर भाजपचे आमदार संजय सावकारे यांनी भाजप नेत्यांच्या ऐवजी एकनाथ खडसे यांचे छायाचित्र लावल्याने सावकारे लवकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

आमदार संजय सावकारे यांचा शुक्रवारी वाढदिवस होता. त्या निमित्ताने सावकारे यांच्या समर्थकांनी भुसावळ शहरात शुभेच्छाचे फलक लावले आहेत. मात्र,  शुभेच्छांच्या फलकावर भाजप नेत्यांची छायाचित्रे न लावता खडसेंची छायाचित्र झळकू लागली आहेत. त्याचबरोबर सोशल मीडियावरील अनेक शुभेच्छा संदेशांवरही भाजप नेत्यांऐवजी खडसे यांचे छायाचित्र होते. त्यामुळे आता सावकारे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा जोरात रंगू लागली आहे.

भाजप आमदार सावकारे खडसे यांचे समर्थक आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत खडसे यांनी सावकारेंना राष्ट्रवादीतून भाजपमध्ये घेतले होते. मात्र, आता खडसेच राष्ट्रवादीत डेरेदाखल झाल्याने इतर समर्थक नेते आणि कार्यकर्तेही राष्ट्रवादी आले आहेत. त्यामुळे आमदार सावकारे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.