मुंबई (प्रतिनिधी) : भोसरी येथील जमीन गैरव्यवहारप्रकरणात ‘इडी’ने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली. मनी लाँड्रिंग प्रकरणात १३ तास कसून चौकशी केल्यानंतर मंगळवारी चौधरींना रात्री अटक करण्यात आली होती. आता १२ जुलैपर्यंत त्यांचा मुक्काम इडीच्या कोठडीत असेल. इडीचा तपास योग्य दिशेने सुरू असून एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी यांनाही अटक होऊ शकते, असे मत ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे खडसे यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

मागील सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ मध्ये झाला होता. बाजारभावाप्रमाणे सुमारे ३१ कोटी रुपये किंमत असलेल्या या भूखंडाची विक्री ३.७ कोटींना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने १९७१ मध्ये तो अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे.

खडसे यांनी १२ एप्रिल, २०१६ रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातलगांना म्हणजे पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांना हा भूखंड विकल्याचे समोर आलं होतं.