महाडिक कुटुंबियाकडून शेणगावच्या पूरग्रस्तांसाठी ८०० पोती सिमेंट 

0
258

गारगोटी (प्रतिनिधी) : महापुराचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या शेणगांव (ता. भुदरगड) गावातील पूरग्रस्तांसाठी कोल्हापूरच्या महाडिक कुटुबियांनी ८०० सिमेंट पोती येथील युवा नेतृत्व देवराज बारदेसकर यांच्या हस्ते प्रदान केली.  

यावेळी कृष्णराज महाडिक म्हणाले की, कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती आली की, महाडिक कुटुंब मदतीसाठी धावून येते. या आपत्तीत शेणगावमध्ये ८०० सिमेंट पोती दिल्याने पूरग्रस्त बांधवांना थोडासा आर्थिक हातभार लागण्यास मदत झाली आहे. तालुक्यातील १२ गावातही सिमेंट पोती देण्यात येणार आहेत. तसेच  जीवनावश्यक साहित्यही पूरग्रस्त कुटुंबीयांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेणगावचे सुपुत्र देवराज बारदेसकर यांनी माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या कार्याचा वसा व वारसा महाडिक कुटुंबियातील कृष्णराज महाडिक यांनी जपला असल्याचे सांगितले. शेणगांव ग्रामस्थांचे अश्रू पुसण्यासाठी या सरसावलेल्या हातांना शेणगांव ग्रामस्थ कधीही विसरणार नाहीत, असे गौरवोद्गार काढले. यावेळी अनेक पूरग्रस्त महिलांनी जिल्ह्यात सर्वात प्रथमच प्रत्यक्षात मदत केल्याची भावना व्यक्त करत महाडिक कुटुंबियांचे आभार मानले.

यावेळी वसंत प्रभावळे (कुर), युवराज पाटील (कोनवडे), मानसिंग तोरसे, उमेश विभूते, अनिल कदम, विजयबाबा महाडिक, नंदकुमार शिंदे, शक्तिजीत पोवार, पार्थ सावंत, तुकाराम देसाई, प्रविण आरडे, किरण खेडकर, विनोद जाधव, पांडुरंग गुरव, धनाजी देसाई, शशिकांत पाटील आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

सूत्रसंचालन व आभार राजेंद्र शिंदे यांनी मानले.