कोल्हापूर (प्रतिनिधी) : दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या नॉनस्टीक वस्तूंमुळे यकृताचे विकार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांचा अतिवापर टाळावा, असा सल्ला अमेरिकेतील कान्सास विद्यापीठातील फार्मेकॉलॉजी-टॉक्झिकॉलॉजी विभागातील शास्त्रज्ञ डॉ. उदयन आपटे यांनी आज (गुरुवार) येथे दिला.

शिवाजी विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र अधिविभागात ‘डेसिफरिंग मॅकेनिझम्स ऑफ लीव्हर टॉक्झिसिटी इन्ड्युस्ड बाय पॉलीफ्लुरोअल्काईल सबस्टन्सेस (पी.एफ.ए.एस.) युजिंग ग्लोबल जीन एक्स्प्रेशन अॅनालिसीस’ या विषयावरील विशेष व्याख्यानामध्ये ते बोलत होते.

नॉनस्टिक भांडी, रेनकोट, वॉटरप्रुफ मेकअप उत्पादने आणि स्टेनप्रूफ कपड्यांच्या अतिवापरामुळे यकृताचे आजार होऊ शकतात, असे सांगून डॉ. आपटे म्हणाले, पी.एफ.ए.एस. रसायनांच्या अतिवापरामुळे रोगप्रतिकारक शक्ती, प्रजननक्षमता, गर्भवाढ आणि यकृतावर दुष्परिणाम होतात. कर्करोगासारखे घातक आजारही उद्भवू शकतात. सात वर्षांच्या संशोधनानंतर माझ्या असे लक्षात आले की, पी.एफ.ए.एस.चा अर्धायुकाल (हाफ लाईफ पिरियड) तीन वर्षांचा असून, त्याचे विघटन लवकर होत नाही. त्याचा यकृताशी संबंध आल्यास यकृताला सूज येणे, यकृतात चरबी साठणे तसेच हायपर कोलेस्ट्रोलेमियाचा धोका उद्भवतो. भारतामध्ये याचा वापर अतिरिक्त असूनही त्यावर अजून संशोधन झालेले नाही. भारतामध्ये या संदर्भातील अधिक संशोधनात्मक माहिती मिळविणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रास्ताविक डॉ. माधुरी वाळवेकर यांनी केले. अधिविभागप्रमुख डॉ. आशीष देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. एन. ए. कांबळे यांनी आभार मानले. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे डॉ. मेघनाद जोशी, वेंगुर्ला येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे डॉ. वसंत पाटोळे, डॉ. नितीन पोटफोडे, सुभाष मुंजे, डॉ. एस. एम. गायकवाड, डॉ. एस. आर. यंकंची, डॉ. एम. पी. भिलावे, संशोधक व एम.एस्सी.चे विदयार्थी उपस्थित होते.