गारगोटी (प्रतिनिधी) : सामान्य जनतेचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी केंद्र व राज्य शासानाच्या अनेक लोककल्याणकारी योजना आहेत. या योजनांची ग्रामीण भागातील सर्वसामन्य शेतकरी आणि नागरीकांना लाभ व्हावा. यासाठी या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, अशा सुचना आ. प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. ते भुदरगड येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे आढावा बैठकीमध्ये बोलत होते.

यावेळी आ. आबिटकर म्हणाले, शेतक-यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभागाच्या योजना महत्त्वपूर्ण आहेत. शेतकऱ्यांसाठी असलेल्या प्रत्येक योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचला पाहिजे. शेतीपूरक उद्योगांच्या वाढीसाठीही प्रयत्नांची गरज आहे. रेशीम शेती, शेततळयांमध्ये मत्स्यपालन, यांत्रिकीकरणावर भर देण्यासोबतच शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. शेती आणि शेतक-यांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे.

तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कृषि यांत्रिकीकरण अभियान, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, गट शेती योजना, राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत मृद आरोग्य पत्रिका कार्यक्रम, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना अंतर्गत पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, आदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना आदी योजनांची माहिती व लाभ देण्यासाठी योग्य कार्यक्रम आखण्याच्या सुचना यावेळी त्यांनी केल्या.

यावेळी तालुका कृषि अधिकारी नितीन भांडवले, मंडळ अधिकारी ओंकार कराळे, बी.पी.पाटील, विठ्ठल चव्हाण, पी.आय.पाटील, रमेश पाटील, बाजीराव चव्हाण, कृषि सहाय्यक, कृषि सेवक उपस्थीत होते.