कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्याच्या काळात सोशल मीडियासह विविध माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे विशेषत: तरुण वर्ग माध्यमांच्या आहारी जात असून, त्यातून नैराश्यासह विविध आजार उद्भवत आहेत; मात्र कोणतेही मध्यम वाईट नसते. त्याचा वापर व त्यासाठीची वेळ यावर नियंत्रण ठेवल्यास चांगले परिणाम मिळतील, असे प्रतिपादन मानसोपचार तज्ज्ञ व डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या मानसोपचार विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. देवव्रत हर्षे यांनी केले.

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार समितीच्या वतीने (आयसीसी) माध्यमांच्या व्यसनातून मुक्ती या विषयावरील चर्चासत्रामध्ये डॉ. हर्षे बोलत होते.

सध्याची युवा पिढी फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, ट्वीटर, टी.व्ही., ओ.टी.टी अशा विविध माध्यमांवर सतत व्यस्त असते. इंटरनेटमुळे कोणतीही माहिती त्वरित उपलब्ध होते. इंटरनेट, गेम यामुळे अनेकाना या माध्यमांचे व्यसन लागल्याची स्थिती आहे. हे व्यसन मानसिक ताण, नैराश्य व त्या अनुषंगाने विविध आजारानाही निमंत्रण देत आहेत. त्यामुळे या व्यसनातून मुक्त होण्यासाठी मनापासून प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

आजच्या स्पर्धात्मक व तंत्रज्ञानपूरक युगात माध्यामंचा वापर अनिवार्य आहे. अनेक लोकांचे करिअर माध्यमावरच अवलंबून असते; मात्र माध्यमांचे नियंत्रण आपल्यावर नसावे तर आपले नियंत्रण माध्यमांवर असले पाहिजे. हे तत्व पाळून माध्यमांचा प्रभावी वापर केल्यास सर्वांचेच जीवन सुकर बनेल, असा विश्वास डॉ. हर्षे यांनी व्यक्त केला.

प्राचार्य डॉ संतोष चेडे, प्रा. नीला जिरगे, डॉ. ज्योती जाधव, प्रा. शताक्षी कोकाटे, प्रा. निराली गिलबिले, प्रा. रसिका हावळ यांच्यासह आयसीसी सदस्य आणि २५० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष-आ. सतेज डी.पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे यांचे मार्गदर्शन लाभले.