कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात, डोंगर कपारीतील वाड्या-वस्त्यांवर आर्थिक साक्षरतेची फार मोठी गरज आहे. केडीसीसी बँकेच्यावतीने हे काम अत्यंत प्रभावीपणे सुरू असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी सांगितले. ते राधानगरी तालुक्यातील बारडवाडी येथे आर्थिक डिजिटल जागृती कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक आशुतोष जाधव होते.      

यावेळी ए. वाय. पाटील म्हणाले की, शहरीकरणापासून दूरवर असलेल्या खेड्यापाड्यातील ग्राहकाला डिजिटल बँकिंग समजावे म्हणून हा उपक्रम अतिशय उपयुक्त आहे. जिल्हा बँकेने या क्षेत्रात मोठी कामगिरी केली असल्याचे सांगितले. आशुतोष जाधव यांनी, नाबार्डने केडीसीसी बँकेच्या माध्यमातून हा कार्यक्रम हाती घेतला आहे. हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने राबविला जात असल्याचे सांगितले. बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी, केडीसीसी बँकेने तंत्रज्ञानात गरुड झेप घेतलेली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने ग्राहकांच्या वेळ आणि पैशाचा अपव्यय टाळून गतिमान सेवा देण्यासाठी बँक कटिबद्ध असल्याचे सांगितले.

बँकेतर्फे राधानगरी तालुक्यातील संकपाळवाडी, पालकरवाडी, चांदेकरवाडी, चंद्रेपैकी गणेशवाडी, मोरेवाडी, तारळे खुर्द, घोटवडे, शिरगाव, येळवडे, आकनूर, धामोड, म्हासुर्ली, आडोली आदी गावांमध्येही आर्थिक साक्षरता मेळाव्यामधून डिजिटल बँकिंग कसे करावे याबद्दल ग्राहकांना मार्गदर्शन केले. जिल्हा पत आराखड्यात बारडवाडी गावाची कोरडवाहू अशी नोंद आहे. या गावात दूधधंदा वाढीला चालना देण्यासाठी बँकेने दोन कोटी रुपयांचे म्हैशीसाठी कर्ज दिले होते. त्यानंतर अवघ्या एक महिन्यातच एक कोटीचे अनुदान शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर जमा झाले. याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी विष्णूमामा बारड, सर्जेराव बारड, बळवंतराव बारड, तालुका सीआरपी सौ. पवार,  रणजीत पाटील, बचत गट संघटक गीता पाटील, बँकेचे विभागीय अधिकारी विजय तौदकर, बँक निरीक्षक शामराव पाटील, रमेश पाटील, तालुक्यातील सेवा संस्था, दूध संस्था, सहकारी संस्थांचे सचिवही उपस्थित होते.