मुंबई : अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने  व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेतल्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. अमेरिकन शेअर बाजारासह इतर बाजारांमध्ये मोठी घसरण दिसून आली. भारतीय शेअर बाजारावरही याचा परिणाम दिसून आला. बाजार उघडताच सेन्सेक्स  ३८०  अंकांनी खाली आला. तर, निफ्टी निर्देशांकदेखील १०० अंकांनी घसरला.

महागाईला नियंत्रित करण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याज दरात वाढ केली होती. त्यानंतर अमेरिकन शेअर बाजारात घसरण दिसून आली. भारतीय शेअर बाजारातही घसरण दिसून आली. आज सकाळी घसरणीसह बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाली मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १३७  अंकांच्या घसरणीसह ५९३१८.९३  अंकांवर व्यवहार करत होता. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ३० अंकांच्या घसरणीसह १७,६८७.९५  अंकांवर व्यवहार करत होता.

आज शेअर बाजारात आयटीसी, मारुती सुझुकी, बजाज फायनान्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँकेच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर,  एचडीएफसी, टेक महिंद्रा, विप्रो, बजाज फिनसर्व्ह, एचसीएल टेक, एचडीएफसी बँक, इन्फोसिसच्या शेअर दरात घसरण दिसून आली.