धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील धामोड येथील माजी सरपंच डी. जी. नलवडे आणि एन. जी. नलवडे यांच्या सहा मुलांनी शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवले. त्यांचा हा आदर्श राधानगरी तालुक्यातील सर्व मुलांच्या समोर निर्माण करत असल्याचे मत शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी व्यक्त केले. ते धामोड येथे या मुलांच्या सत्कार समारंभात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले होते.

यावेळी चरापले यांनी, एवढ्या ग्रामीण भागात एकाच घरातील सर्वच्या सर्व सहा मुले उच्चतम शिक्षण घेणे म्हणजे त्यांच्या अपार जिध्दीचे कौतुक करावे तितके थोडेच असल्याचे सांगितले. एन. जी. नलवडे म्हणाले की, मराठी माध्यमाकडे सर्व पालक दुर्लक्ष करीत आहेत. या सर्व मुलांनी प्राथमिक शाळा धामोड, माध्यमिक शिक्षण आण्णासाहेब नवणे माध्यमिक विद्यालय, सह्याद्री ज्यूनिअर कॉलेज येथे मराठी माध्यमातूनच शिक्षण घेतले आहे. त्यामुळे पालकांनी मराठी माध्यमाकडे दुर्लक्ष करु नये, असे आवाहन केले.

यावेळी बाजीराव फराकटे, प्रवीण ढोणे, कोजीमाशी संचालक संजय डवर, पाटबंधारे शाखा अभियंता विजय आंबोळी, राजेंद्र पाटील, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.