मुंबई (प्रतिनिधी) : राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (शुक्रवार) १६ जुलै रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाची दहावीच्या परीक्षा रद्द करून, सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्याबाबत परवानगी मंत्रिमंडळाने दिली असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

गायकवाड यांनी सांगितले की, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागीय मंडळामार्फत २०२१ मध्ये दहावी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी)  http: //result.mh-ssc.ac.in  या संकेतस्थळावर उपलब्ध होतील व या माहितीची प्रत घेता येईल. मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ http: //result.mh-ssc.ac.in असे आहे. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार इ. ९ वीचा अंतिम निकाल, १० वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व इ. १० वीचे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक अंतर्गत मूल्यमापन इत्यादींच्या आधारे माध्यमिक शाळामार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे. त्याप्रमाणे मंडळाने विहित कार्यपद्धतीनुसार या परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केली.