शाळांमध्ये रोज ‘इतके’ तास होणार… : शिक्षणमंत्र्यांची माहिती

0
86

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रादुर्भाव व जिल्ह्या-जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात आहे. अशा वेळी शिक्षण चालू करणे आव्हानात्मक असले तरी विद्यार्थ्यांचे आरोग्य व शिक्षण विचारात घेऊनच शिक्षण विभागाने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू झाल्यानंतर ४० मिनिटांचे चार तासच शाळेत होणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आज (मंगळवार) प्रसारमाध्यम प्रतिनिधींना दिली.

त्या म्हणाल्या की, २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करत असताना केंद्र व राज्य सरकारने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करूनच अध्ययन – अध्यापन प्रक्रिया सुरू होणार आहे. ४० मिनिटांचे चार तासच शाळा होईल. शाळा भरवताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याची चनाही दिल्या आहेत. त्यांचे सूचनांचे पालन होते आहे की नाही याची तपासणी संबंधित अधिकारी करणार आहेत. शाळा सुरू करण्यापुर्वी जिल्हा प्रशासन व महापालिकेतर्फे आरोग्य तपासणी होणार आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेतर्गंत आरोग्य चाचणी राज्यात होतच आहे. अशा वेळी शाळेतील वर्ग सुविधा नसल्यास खुल्या मैदानावर, मोकळ्या जागेत तसेच खेळत्या हवेच्या वर्गात घेण्याचीही मुभा शाळा व्यवस्थापनास दिली आहे.

ऑनलाईन शिक्षणात शिकवलेल्या अभ्यासक्रमाची उजळणी, शंका समाधान व नवा विषय प्रत्यक्ष वर्गात शिकवला जाईल. दहावी व बारावीच्या परीक्षा संदर्भात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व शिक्षण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत. सर्वसाधारणपणे या वर्षी परीक्षा उशिरा घेण्यात येतील असा अंदाज आहे. विदर्भातील ऊन, कोकणातील पाऊस व इतर जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेऊनच मे महिन्याच्या सुरुवातीला परीक्षा होऊ शकतात.