शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केली पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होण्याची तारीख…  

0
468

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. बहुतांशी सर्व व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. त्यामुळे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील ५ वी ते ८ च्या शाळा सुरू करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई वगळता राज्याच्या इतर भागातील शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत २७ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. या निर्णयाची माहिती मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज (शुक्रवार) शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली.

कोरोना लसीकरणाला उद्यापासून प्रारंभ होत असताना शाळा आणि शैक्षणिक संस्था पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण माहिती दिली. राज्यातील ५ ते ८ वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत २७ जानेवारीपासून सुरू होतील असे त्यांनी सांगितले. शाळा सुरू करताना विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी कोरोनाविषयक काळजी घ्यावी अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांना केली आहे. राज्यातील ५ वी ते ८ वीपर्यंत शाळा २७ जानेवारीपासून सुरू होणार असल्याचं सांगितलं असलं, तरी मुंबई पालिकेकडून शाळा पुढील सूचनेपर्यंत बंद राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.