इस्लामाबाद (प्रतिनिधी) :  पाकिस्तानमध्ये पेट्रोलपेक्षाही महाग खाद्य तेलाचे दर झाले आहेत. इथे पेट्रोल परवडेल पण खाद्यतेल नाही असं म्हणायची वेळ आली आहे. पाकिस्तानमध्ये सध्या महागाई शिगेला पोहोचली आहे. पाकिस्तानात महागाईमध्ये 12.66 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खाण्यापिण्याच्या किंमतींवर आणि पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर झाला आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 10 रुपयांपेक्षा जास्त वाढ केली. त्यानंतर सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडताना दिसत आहे. सतत वाढत जाणाऱ्या किमतींमुळे पाकिस्तानी लोकांच्या जीवनात अडचणी निर्माण झाल्या आहेत. पाकिस्तानमध्ये पेट्रोलची किंमत 137.79 रुपये आणि हायस्पीड डिझेलची किंमत 134.48 रुपये झाली आहे. एक दिवसापूर्वी, सरकारने विजेच्या किंमतीतही 1.39 रुपयांची वाढ केली होती. जी पुढील महिन्यापासून लागू होणार आहे.