मुंबई (प्रतिनिधी) : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीच्या कारवाईविरोधात संरक्षण मिळावं, याची मागणी करणारी याचिका अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. मात्र, सोमवारी न्यायालयानं ही याचिका फेटाळल्यानंतर आता ईडीनं पुन्हा एकदा अनिल देशमुख यांना समन्स बजावलं आहे. ईडीनं अनिल देशमुख यांना बजावलेलं हे पाचवं समन्स आहे. ईडीनं त्यांना बुधवारी सकाळी चौकशीसाठी हजर राहावे, असे समन्स बजावले असून आता तरी अनिल देशमुख चौकशीसाठी हजर राहणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांसंदर्भात देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या कारवाईमध्ये ईडीनं आत्तापर्यंत अनिल देशमुख यांचे हॉटेल, कॉलेज, घर अशा सर्वच ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याभोवतीचा ईडीचा फास अधिकाधिक आवळला जात आहे.