मुंबई (प्रतिनिधी) : पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने अटक केलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स पाठवले आहे. अटक केल्यानंतर पहिल्यांदा राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली होती.

पत्राचाळ प्रकरणी वर्षा राऊत यांच्या खात्यावरील व्यवहार उघडकीस आल्याने ईडीने हे समन्स बजावले आहे. त्यामुळे आता वर्षा राऊत यांना ईडीसमोर हजर राहावे लागणार आहे. तसेच आपली बाजू मांडावी लागणार आहे

ईडीच्या वकिलांनी गुरुवारी न्यायालयात वर्षा राऊत यांचा आर्थिक गैरव्यवहारात सहभाग असल्यासंदर्भात भाष्य केले होते. ईडीने राऊतांच्या घरावर छापा टाकल्यानंतर काही कागदपत्रे हाती लागली होती. त्यावरून असा समज काढला जात आहे की, संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यातून काही व्यक्तींना मोठी रक्कम पाठवली गेली आहे. त्यांच्या खात्यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाले आहेत.

याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली. ईडी कोठडीत काही त्रास झाला आहे का असे राऊतांना कोर्टाने विचारले असता राऊत म्हणाले की, मला ज्या ठिकाणी ठेवण्यात आले त्या ठिकाणी योग्य व्हेटिंलेश नाही असा आरोप राऊतांनी ईडीवर केला आहे. तर संजय राऊतांना आम्ही एसीमध्ये ठेवण्याचा दावा ईडीने केला आहे. यानंतर कोर्टाने ईडीला फटकारले.