गडहिंग्लज (चैतन्य तंबद) : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षा राज्य सरकारने रद्द केल्या. मात्र युजीसीने (UGC) अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे हे बंधनकारक राहील असे सांगितले. या सर्व गोंधळात भरडले जात होते ते म्हणजे अंतिम वर्षाचे सर्व विद्यार्थी.

राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने असे आदेश दिले की, कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षेविना पदवी देण्यात येऊ नये. त्यामुळे या निर्णयानुसार राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे ठरवले. यामध्ये १ ऑक्टोंबर ते १० ऑक्टोंबरमध्ये बॅकलॉगच्या परीक्षा घेण्यात येतील आणि अंतिम सत्राच्या १० ऑक्टोंबर ते २० ऑक्टोंबर या कालावधीमध्ये घेतली जातील असे सांगितले. बॅकलॉगच्या परीक्षा ऑफलाईन आणि अंतिम सत्राच्या परीक्षा ऑफलाईन तसेच ऑनलाईन या पद्धतीने परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. असे असले तरी, ऐनवेळी विद्यापीठातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे.

त्यामुळे परत एकदा मागील काही महिन्यांपासून परीक्षेबाबत गोंधळात असणारे अंतिम वर्षाचे विद्यार्थी आणि पालक अजूनही वेळापत्रक किंवा परीक्षेबाबत सविस्तर माहिती न मिळाल्याने सांशक आहेत. याबाबत विद्यार्थांच्या भविष्याच्या दृष्टीने विचार करून आंदोलनाबाबत योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे. या परीक्षेवरच विद्यार्थांचे पुढील भवितव्य ठरणार आहे. राज्य सरकारने आदेश दिल्यावर देखील कर्मचाऱ्यांचा आंदोलनामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षेला ग्रहण लागले आहे. आम्हाला वेठीस धरू नये. लवकरात लवकर आम्हाला परीक्षेबाबत योग्य ती सविस्तर माहिती द्यावी, अशी प्रतिक्रिया विद्यार्थी वर्गातून उमटत आहे.