दिल्लीला पुन्हा भूकंपाचे धक्के

0
22

नवी दिल्ली : नवी दिल्लीला बुधवारी पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 2.7 एवढी नोंदवण्यात आली. बुधवारी सायंकाळी 4.42 मिनिटांनी राजधानी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात भूंकपाचे सौम्य धक्के जाणवले.

या भूकंपाचे केंद्र पश्चिम दिल्लीमध्ये होते. याआधी मंगळवारी रात्रीही दिल्ली एनसीआरसह उत्तर हिंदुस्थानात भूकंपाचे मध्यम धक्के जाणवले होते. याची तीव्रता 6.6 रिक्टर स्केल एवढी नोंदवण्यात आली. मंगळवारी रात्री 10.17 वाजण्याच्या सुमारास बसलेल्या भूकंपाच्या धक्के बराच वेळ जाणवत होते. त्यात जिवीत किंवा वित्तहानी झाली नसली तरी नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. या भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानातील हिंदूकुश क्षेत्र होते. अफगाणीस्तानातील कालाफगन भागापासून 90 किलोमीटर दूर असलेल्या भागात याची तीव्रता सर्वाधिक होती.

राजधानी दिल्लीसह उत्तर हिंदुस्थानातील उत्तर काशी, चमोली, गंगा घाटी, यमुना घाटी, मसुरी, पंजाबमधील मोगा, बठिंडा, मानसा, पठाणकोट, उत्तर प्रदेशातील मुरादाबाद, सहारनपूर, शामली आणि जयपूरमध्येही भूंकपाचे धक्के जाणवले.