मुंबई (प्रतिनिधी) : ‘एक नेता, एक झेंडा, एक मैदान… निष्ठेचा सागर उसळणार’ असे म्हणत शिवसेनेतील ठाकरे गटाचा दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा टीझर ट्वीट करण्यात आला आहे. ‘शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा!” असे आवाहन या ट्विट आणि टीझरमधून करण्यात आले आहे.

उद्धव ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची छाप या संपूर्ण टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. ‘भगवा अटकेपार फडकणार, महाराष्ट्राची ताकद दिसणार’ असे या टीझरमध्ये म्हटले आहे. गुरुवारीच शिंदे गटानेही दसरा मेळाव्याचे अधिकृत पोस्टर आणि टीझर प्रसिद्ध केला होता. यामध्ये बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, शिवसेनेचा डरकाळी फोडणारा वाघ अशा शिवसेनेशी संबंधित सर्व प्रतिमांचा वापर केला आहे. या पोस्टरमध्ये ‘एक नेता एक पक्ष एक विचार एकलव्य एकनाथ,’ असा मजकूर लिहित आम्हीच खरी शिवसेना आहोत, असे सांगण्याचा प्रयत्न शिंदे गटाने केला आहे.

उद्धव ठाकरे सध्या पक्ष वाढवण्यासाठी आणि नव्याने बांधणी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या मेळाव्यात काही पक्षप्रवेशही होणार असल्याची माहिती आहे. या सभेत उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे गट आणि भाजपवर तुटून पडणार हे निश्चित आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याचाही ठाकरे आणि शिंदे गटांचा मानस आहे. यासाठी राज्याच्या विविध भागांमधून कार्यकर्ते आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खासगी चार चाकी गाड्यांचे बुकिंग केले जात आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भ, खान्देश या भागातून मुंबईत येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खासगी बसगाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. यात शिंदे गटाकडून ३ हजार आणि ठाकरे गटाकडून १ हजार ४०० बस आरक्षित करण्यात आल्या आहेत. या सर्व गाड्या मुंबईत दसऱ्याच्या दिवशी बुधवारी दुपारपर्यंत पोहोचतील, असे नियोजन आहे.