चंदगड (प्रतिनिधी) : कोरोनामुळे डॉक्टर्स अहोरात्र कष्ट घेत आहेत. आज (शनिवार) नवरात्रोत्सावाच्या पार्श्वभूमीवर चंदगड येथील कोविड काळजी केंद्रावरचे डॉक्टर्स आणि नर्सेसनी एक अभिनव संकल्पना राबवली. यावेळी आरोग्य सेवकांनी आम्ही नवदुर्गा हा जिंवत देखावा सादर करीत रुग्णांना नवदुर्गेचे दर्शन करुन दिले.

आजपासून दसरा उत्सवाला सुरुवात झाली आहे. मात्र, कोविड केंद्रावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या उत्सवात सहभागी होता येत नाही. त्यामुळे आज येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुर्गावतार सादर केला. हातात शस्त्रांऐवजी सलाईनचे स्टँड, स्टेथॉस्कोप अशा डॉक्टरी अवजारांचा वापर करीत ही अभिनव संकल्पना राबवली.

यामध्ये आरोग्याधिकारी डॉ. आर. के. खोत, डॉ. साने, डॉ. सचिन गायकवाड, डॉ. योगेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. स्नेहल पाटील, डॉ. गायत्री निट्टूरकर, पौर्णिमा मळविकर, रतन हाळीज्वाले, निकीता पाटील, रोहन पाटील यांनी सहभाग नोंदवला.