मुसळधार पावसामुळे वेदगंगा पात्राबाहेर…

0
231

गारगोटी (प्रतिनिधी) : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून भुदरगड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे वेदगंगा नदीवरील पाटगांव आणि चिकोत्रा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर या मुसळधार पावसामुळे वेदगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे.

भुदरगड तालुक्याच्या पश्चिम भागात पाटगांव, कडगांव भागात पावसाचा जोर मोठा आहे. पाटगांव धरणक्षेत्रात गेल्या चोवीस तासात ११७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.  तर १ जून २०२१ पासून आजअखेर २९३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर पाटगाव धरण (मौनी सागर जलाशय) ७०.२० टक्के भरले आहे. या पावसामुळे वेदगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे. वेदगंगा नदीवरील वाघापूर, निळपण बंधारे पाण्याखाली गेली आहेत. जर असाच पाऊस सुरू राहिला तर नदीवरील सर्वच बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तसेच बेगवडे- झुलपेवाडी येथे असणाऱ्या चिकोत्रा धरणक्षेत्रात गेल्या चोवीस तासात ९० मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. तर १ जून २०२१ पासून आजअखेर येथे ८६४ मिमी. इतका पाऊस झाला आहे. आजअखेर चिकोत्रा धरणाची पाणी पातळी ६८०.६० मीटर इतकी असून धरण ६०.७७ टक्के इतके भरले आहे.