सत्तारूढ-विरोधकांच्या व्यूहरचनेमुळे ‘गोकुळ’ निवडणूक होणार अटीतटीची…

0
746

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक केंद्र असलेल्या गोकुळ दूध संघाच्या  निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय. सत्तारूढ गट आणि विरोधकांच्या उमेदवारांची नावे जवळपास निश्चित झाली आहेत. अजून कोणत्याही पॅनेलची घोषणा झाली नसली तरीही जिल्ह्यात उमेदवार मात्र थेट मतदारांच्या घरापर्यंत पोचून आपली भूमिका समजावून सांगत आहेत. प्रत्येक तालुक्यात विरोधकांच्या अंतर्गत हालचाली जोरदारपणे सुरु झाल्या आहेत. मागील चार-पाच दशकांपासून एकतर्फी होत असलेली ही निवडणूक या वेळी मात्र खूपच अटीतटीची होण्याची शक्यता आहे.

गोकुळ निवडणुकीसंदर्भात सत्तारूढ आणि विरोधक यांची एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी बैठक झाली. यामध्ये कोण कोणाबरोबर जाणार हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. मागील अनेक वर्षे सत्ताधारी गटाबरोबर असणारे विश्वास पाटील, अरुण डोंगळे, आमदार राजेश पाटील, शशिकांत पाटील-चुयेकर, विलास कांबळे हे मात्र काल झालेल्या सत्ताधारी गटाच्या आढावा बैठकीला हजर नव्हते. गैरहजर असलेल्या सर्वांचे विरोधी गटातून लढण्याचे निश्चित झाल्याचे दिसून येते. अंबरीशसिंह घाटगे हे आढावा बैठकीला हजर होते, मात्र त्यांची भूमिका शेवटच्या क्षणापर्यंत सत्तारूढ आणि विरोधक यांची उत्कंठा वाढवणारी असेल असे वाटते.

मागील निवडणुकीत शेवटच्या क्षणी मंत्री हसन मुश्रीफ यांचा तीव्र विरोध असतानाही घाटगे यांना उमेदवारी देऊन पालकमंत्री सतेज पाटील यांनी निवडून आणले होते. पण त्यानंतर मात्र घाटगे हे सत्ताधाऱ्यांबरोबर राहिल्याचे दिसून आले. चंदगडचे आमदार राजेश पाटील यांची मानसिकता सत्ताधारी गटाबरोबर जायची असली तरी ते राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि त्यांना मंत्री मुश्रीफ यांचे सहकार्य घ्यावे लागत असलेमुळे नाइलाजास्तव विरोधी गटाकडूनच लढावे लागणार असे दिसते. तसे त्यांनी अनेक ठिकाणी खाजगीत बोलून दाखवल्याचे सांगण्यात येते. आमदार सत्यजित पाटील, करणसिंह गायकवाड, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके या सर्वांचे महाविकास आघाडीबरोबर राहण्याचे निश्चित झाले आहे.

गोकुळच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त झाल्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. पण निवडणुका पुढे जाणार अशा मध्येच अफवाही पसरवल्या जात आहेत. अरुण डोंगळे, विश्वास पाटील, शशिकांत पाटील-चुयेकर आणि करणसिंह गायकवाड हे चंदगड, आजरा, गडहिंग्लज, राधानगरी तालुक्यात मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन आपली भूमिका पटवून देत असल्याचे दिसून येते. सत्ताधारी गटाकडून मात्र म्हणावा तसा प्रचार चालू झालेला दिसून येत नाही.

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या गटाने काही महिन्यांपासून तयारी केलीय. गेल्यावेळी एकाकी लढणाऱ्या पालकमंत्री पाटील यांना महाविकास आघाडीचे बळ मिळाल्यामुळे त्यांचे मनोधैर्य खूपच वाढले आहे. पण गेली चाळीस वर्षे सत्तेच्या बेरजेचे राजकारण करणारे महादेवराव महाडिक हेसुद्धा जुळण्या लावण्यात तरबेज आहेत. त्यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी गोकुळची निवडणूक आत्ता मात्र ‘हाय व्होल्टेज’ लढत होणार आहे हे मात्र नक्की झाले आहे.