कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी अखेर माजी आमदार अमल महाडिक यांच्या नांवावर भाजपने शिक्कामोर्तब केला. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासाठी एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे. तर पुन्हा एकदा जिल्ह्यात पाटील विरूद्ध महाडिक असा अटीतटीचा सामना रंगणार असून २०१४ मधील विधानसभा निवडणुकीतील राजकीय धुमशान पाहायला मिळणार आहे.

२००९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर महाडिक आणि सतेज पाटील यांच्यामधील मतभेद वाढू लागले. तर २०१४ मधील विधानसभेच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्याविरूद्ध अनपेक्षितपणे अमल महाडिक यांची भाजपकडून उमेदवारी जाहीर करून मोठे आव्हान उभे करण्यात आले. अन् तेथेच पाटील आणि महाडिक यांच्यामध्ये संघर्षाची ठिणगी पडली. राज्यमंत्री असल्याने पाटील यांना सहज वाटणाऱ्या या निवडणुकीत अमल महाडिक यांच्या उमेदवारीमुळे चांगलीच दमछाक झाली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कमी दिवसांच्या झंझावती प्रचारामुळे महाडिक यांनी मतदारसंघात पाटील यांच्याविरूद्ध वातावरण निर्मितीत यश मिळवले. परिणामी पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. हा पराभव पाटील यांच्या चांगलाच जिव्हारी लागला.

या पराभवामुळे पाटील आणि महाडिक यांच्यातील संघर्ष आणखीच तीव्र झाला. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय जोडण्या लावत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आपल्या स्नुषा शौमिका महाडिक यांना जि.प.च्या अध्यक्षपदी विराजमान केले. दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले. धनंजय महाडिक यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली. परंतु, विधानसभेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी ‘आमचं ठरलंय’ असे म्हणत सतेज पाटील यांनी आघाडीधर्म झुगारून महाडिकविरोधी भूमिका घेत शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यामागे ताकद लावली. आणि महाडिकांच्या पराभवामध्ये मोठा वाटा उचलला.

त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पुतणे ऋतुराज पाटील यांना उतरवून अमल महाडिक यांना चितपट केले. महाडिकांचे बलस्थान असलेल्या ‘गोकुळ’वरही पाटील यांनी वर्चस्व मिळवत विधानसभेतील पराभवाची परतफेड केली. सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून पाटील यांनी प्रचाराच्या दोन तीन फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. परंतु, सुरूवातीला एकतर्फी वाटणाऱ्या या निवडणुकीत अमल महाडिक यांच्या उमेदवारीमुळे चुरस निर्माण झाली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीचे बारकावे माहीत असलेले माजी आमदार महादेवराव महाडिक ही निवडणूक सहज घेणार नाहीत. जिल्ह्यात जोडण्या लावण्यात सुरूवात झाली असून पडद्यामागून सूत्रे हलविण्यातील महाडिकांचे कसब पाहता ना. पाटील यांचीही दमछाक होण्याची शक्यता आहे.

महाडिकांचे प्रत्येक तालुक्यात असलेले कार्यकर्त्यांचे जाळे, आर्थिक रसद, मतदारांना आकर्षित करण्याच्या क्लृपत्या, महाडिक नावाचे वलय आदी निकषांवर भाजपने अमल महाडिक यांना रिंगणात उतरवून पालकमंत्री पाटील यांच्यासमोरील अडचणी वाढविल्या आहेत. पाटील यांच्याविरोधात रान उठविण्यात महाडिक कुटुंबियांनी सुरूवात केली आहे. मतदारांच्या गाठीभेटी, संपर्क वाढविला असून प्रचारयंत्रणा गतिमान केली आहे. त्यामुळे जिल्ह्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील ईर्षा, चुरस, जोश, उत्साह, कुरघोड्या, शहकाटशह, चढाओढ असे वातावरण पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.  राजकीय चमत्कार घडवून आणण्यात पारंगत असलेले महादेवराव महाडिक विधान परिषद निवडणुकीत आपला करिष्मा दाखविणार की ना. सतेज पाटील आपली विजयी घोडदौड चालू ठेवणार ? याकडे आता जिल्ह्यासह राज्याचे लक्ष असेल.