ड्रोनद्वारे गावठाण मोजणीमुळे अचूक मालमत्ता पत्रक तयार होणार : हसन मुश्रीफ

0
81

कोल्हापूर (प्रतिनिधी) :- ड्रोनद्वारे गावठाण मोजणी झाल्यानंतर गावातील मालमत्तांचे जीआयएस प्रणालीवर आधारित अचूक मालमत्ता पत्रक तयार होणार आहे. अचूक मालमत्तापत्रक तयार झाल्याने याचा लाभ गावकरी व ग्रामपंचायत यांच्यासाठी लाभदायी ठरेल, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागल तालुक्यातील बामणी येथे ड्रोनद्वारे गावठाण मोजणी योजनेचा शुभारंभ  मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते ड्रोन उडवून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

मुश्रीफ म्हणाले की, शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे त्यांच्या जमिनीचा ७/१२ उतारा उपलब्ध होतो. त्याच प्रमाणे गावठाणाचे सीमांकन झाल्यानंतर प्रत्येक नागरिकास त्याच्या हक्काचे मालमत्ता पत्रक उपलब्ध होणार आहे. अचुक मालमत्ता पत्रकामुळे नागरिकांना त्यांच्या मालमत्तेचे व्यवहार करण्यास कोणतीही समस्या येणार नाही. खरेदी-विक्री, बँक कर्ज, मिळकत हस्तांतर या बाबी सुलभतेने पार पाडण्यास मदत होईल. पारंपरिक मोजणी पद्धतीपेक्षा कमी वेळेत, कमी श्रमात आणि कमी मनुष्यबळाचा वापर करुन मोजणी होणार असून ड्रोनद्वारे केलेल्या मोजणीमध्ये पारदर्शकता व अचुकता असणार आहे. तसेच गावाच्या नियोजनबद्ध विकासासाठी ग्रामपंचायतीना बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, कागल पंचायत समितीच्या सभापती पुनम मगदूम, जिल्हा परिषद सदस्य अंबरिष घाटगे, उपविभागीय अधिकारी रामहरी भोसले, तहसिलदार शिल्पा ठोकडे, भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक वसंत निकम, बामणीचे सरपंच रावसाहेब पाटील यांच्यासह बामणी व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.