वाहन चालकांनी स्वतःहून काळजी घेणे आवश्यक : प्रसाद गाजरे

0
157

टोप (प्रतिनिधी) : अति घाई, गर्दी यामुळे होत असलेले अपघात टाळण्याठी वाहनचालकांनी स्वत:हून काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावरून वाहन चालविण्याबाबत योग्य ती खबरदारी बाळगावी. असे मत कोल्हापूर जिल्ह्याचे उप-परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी व्यक्त केले. ते नागांव येथे ट्रान्सपोर्ट असोशिएशनतर्फे ३२ वे राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियान आणि सभासद प्रमाणपत्र वितरणावेळी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी कोल्हापूर जिल्हा लॉरी असोशिएशनचे सुभाष जाधव होते.

प्रसाद गाजरे म्हणाले की, वाहनचालक आणि मोटरमालकांनी आपआपल्या वाहनांचे वेळेवर आरटीओ नियमानुसार सर्व कागदपत्रांची तपासणी करावी. नियमाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी, असे ते म्हणाले. तसेच  सुभाष जाधव यांनी, असोशिएशनच्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट व्यावसायातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी तत्पर राहणार आहे. चालकांनी आरटीओ नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. गाडी लवकर खाली करण्यासाठी वेळेत पोचण्याच्या प्रयत्नात नियमाचे उल्लंघन करून दंडात्मक कारवाईला सामोरे जाण्याचे धाडस करू नका, असे आवाहन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सभासदाना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

यावेळी स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील, संस्थेचे सेक्रेटरी महेंद्र पाटील, उपाध्यक्ष जावेद पुणेकर, मन्सूर नदाफ, दिलीप शिरोळे, राहूल चौगुले, प्रल्हाद चौधरी, शंकरराव घाटगे, विष्णुपंत पाटील, बाळासाहेब आलाट आदी उपस्थित होते.