नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंडच्या माजी राज्यपाल आणि एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी संसद भवनात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह एनडीएचे नेते उपस्थित होते. द्रौपदी मुर्मू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत एनडीएने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. 

राष्ट्रपतीपदाची उमेदवारी म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारी अर्जावर प्रस्तावक आणि समर्थक म्हणून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्वाक्षरी केली आहे. द्रौपदी मुर्मू यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह अन्य विरोधी पक्षांकडे राष्ट्रपती निवडणुकीसाठी समर्थन मागितले आहे.

एनडीएचे उमेदवार मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यात झाला. द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात एक नगरसेविका म्हणून केली. नंतर त्या रायरंगपूर राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या उपाध्यक्षा बनल्या. २०१३ मध्ये त्या पक्षाच्या एसटी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्याच्या पदावर पोहोचल्या.

तत्पूर्वी द्रौपदी मुर्मू ओडिशात भाजप  आणि बिजू जनता दल यांच्या युती सरकारच्या काळात २०००-२००२ पर्यंत वाणिज्य आणि वाहतूक विभागाच्या स्वतंत्र प्रभारासह ६ ऑगस्ट २००२ ते मेपर्यंत मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री होत्या. द्रौपदी मुर्मू या २००० आणि २००४ मध्ये ओडिशाच्या रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. पुढे २०१५ मध्ये त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.