कोल्हापूर (प्रतिनिधी) : महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रातील कनिष्ठ संशोधक सहायक डॉ. क्रांती बाळासाहेब पाटील यांना गुजरातमधील नवसारी कृषी विद्यापीठाची पीएचडी प्रदान करण्यात आली आहे.

मृद्विज्ञान व कृषी रसाययनशास्त्र या विषयात दक्षिण गुजरातमधील ऊस पिकासाठी स्फुरद अन्नद्रव्याच्या विविध मात्रा, त्याच्या वापरण्याच्या विविध पद्धती व माईकोरायझा वापरून स्फुरदाची कार्यक्षमता वाढवणे या विषयावर दोन वर्षे प्रत्यक्ष प्रयोग करून प्रबंध सादर केला होता. नाटोली (ता. शिराळा, जि. सांगली) येथील शेतकरी कुटुंबातील असलेल्या डॉ. क्रांती पाटील यांनी कोल्हापुरातील ऊस संशोधन केंद्रात आपली सेवा बजावली आहे.

सध्या त्या पाडेगाव (जि. सातारा) येथील ऊस संशोधन केंद्रात कार्यरत आहेत. त्यांना सहयोगी प्राध्यापक डॉ. सोनल त्रिपाटी या मार्गदर्शिका लाभल्या. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, शिक्षण संचालक डॉ. अशोक फरांदे, विभागप्रमुख डॉ. बापूसाहेब भाकरे, माजी शास्त्रज्ञ डॉ. बालकृष्ण जमदग्नी, वडील निवृत्त शिक्षक बाळासाहेब पाटील, आई निवृत्त मुख्याध्यापिका सुमन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.